गगन सदन

 लहानपणी 'अपूर्वाई' वाचल्यापासून मनात विमान प्रवासाचं आकर्षण होतं, आपण पण कधी तरी विमानात बसू का, आपण पण कुठेतरी बाहेर जाऊ का हे विचार पुलंचा एकंदर इंग्लंडप्रवास वाचून सतत मनात यायचे. दैवयोगाने पुढे अनेकदा ती इच्छा पूर्ण झाली पण विमानप्रवासाची आणि एकंदर त्या तयारीची अपूर्वाई अजूनही गेली नाही. व्हिसा मिळवायची लगबग आधी सुरू होते, मग हळूहळू आतल्या खोलीत प्रवासात न्यायला म्हणून खरेदी केलं जाणारं सामानसुमान पाय पसरून बसतं आणि त्यातील मग अर्धनुर्धं बॅगेत बसत नाही, विमानाची तारीख चुकू नये म्हणून सतत तिकीट चेक करणं, प्रत्यक्ष प्रवासादिवशी झाली न झाली अशी झोप घेऊन विमानतळावर जाणं, एकदा 23 किलोच्या खाली वजन भरलं की टाकलेला निःश्वास, सिक्युरिटीत पलीकडे आपलं सगळं सामान चेक होऊन आलंय ना हे दोन दोनदा बघणं, सतत पासपोर्ट तर विसरला नाही ना हे बघायला नकळत खिशाकडे चाचपडणारा हात नि अशा अवस्थेत गेटला येऊन बसलं की मग तासभर घरी कॉल्स. आणि असे कॉल्स सुरू असतानाच मग बोर्डिंगची आरोळी ऐकू येते आणि सगळा जथ्था गेटवर मोठी रांग धरून उभा राहतो. मी आपला शेवटी जातो, एक तर आपली सीट कोणी चोरत नाही आणि रांगेत उभं राहून आत विमानात गेलं तरी शेवटचा प्रवासी बोर्ड होईस्तोवर आत बसून राहावं लागतं, त्यापेक्षा ऐनवेळी गेलेलं बरं. स्थानापन्न झाल्यावर मग जेवण काय मिळणार याची उत्सुकता, ते चांगलं असेलच असं नाही (डेल्टा एअरलाईन्स ने शाकाहारी म्हणून चिकन पीस दिलेली आठवण अजून ताजी आहे ) पण त्यातला surprise element मात्र कमी होत नाही, जेवण झालं की खिडकीतून दिसणारे खालचे नजारे बघत आपलं आपल्याशी बोलणं, विचार हे सगळं होत असतं. यातल्या प्रत्येक गोष्टीची अपूर्वाई एकदा तरी अनुभवावी अशीच! 


या विमानाच्या खिडकीतून कधी काय दिसेल हे सांगता येत नाही. अथांग समुद्राची निळाई, सहलीला गेल्यासारखे निवांत जाणारे ढगांचे पुंजके, पर्वत, शहरांचे मनोरे किंवा रात्री त्यांचे उजळलेले नकाशे... असं बरंच काही! आज एक वेगळाच योग आला तो मात्र Air India तल्या बंद पडलेल्या ऑन बोर्ड मॉनिटर्समुळे. समोर काही बघायला नाही त्यामुळे पूर्ण वेळ खिडकीला नाक लावून विहंगमावलोकन सुरू होतं. आणि तेवढ्यात हिंदुकुश पर्वताची हिमशिखरे दिसली, नजर जाईल तिथवर ढगातून वाट काढून स्वतःचं शुभ्र रूप दाखवणारे ते समाधिस्थ कडे बघितले आणि त्या विशालकाय पर्वताच्या समोर स्वतःचं नगण्य अस्तित्व जाणवून अचानक खूप हलकं वाटायला लागलं. पर्वत ओलांडले आणि अचानक सूर्यबिंब अस्ताला निघालं. एकतर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना आपण सूर्याबरोबरच प्रवास करतो त्यामुळे सूर्यास्त सुरू झाला तरी प्रत्यक्ष अस्त होऊन बिंब ढगाआड जायला बराच वेळ लागतो. आणि विमानात ढगांच्या पातळीच्याही वर असल्याने इथे रंगणाऱ्या अस्तनाट्यासाठी स्वतः ढगच रंगमंच होतात. पांढरट करड्या ढगांची असीम दुलई, कुठूनही पाहिलं असता त्याच्या मधोमध तरंगणारा तो लोहगोल, आणि तिथून वर सुरू होणाऱ्या अनेकविध नारिंगी छटांच्या साड्यांपासून बनवलेली गोधडी कुणी धरावी असं खालपासून वरपर्यंत गडद नारिंगी ते निळ्याला हलकेच बोट लावलेल्या नारिंगीपर्यंत नजर जाईल तिथवर पसरलेलं अमर्याद भगवेपण! अशा नाट्याला टाळ्या वाजवून दाद देण्याची आपली लायकी नसतेच, किंबहुना तिथे हात टाळ्या वाजवायला नसतातच, ते आपसूकच जोडले जावेत! 


अशा सगळ्या त्या भारून टाकणाऱ्या वातावरणात माझ्या कानात 'गगन सदन' मधून लताबाईंचा तिलक कामोद वाजू लागला, तोच तो समोर दिसणारा. तिमिर हरून प्रकाशासाठी प्रार्थना त्या तेजोमयाकडे करायला यापेक्षा अजून शकुनवंत मुहूर्त, ते मागणं गायला तिलक कामोदपेक्षा शकुनवंत राग आणि ते गगन सदनी पोचवायला लताबाईंपेक्षा शकुनवंत स्वर सापडणे शक्य नाही! तेजोमय म्हणतांना खालून सुरू होऊन पंचमावर जाणे आणि पुन्हा खाली येणे म्हणजे त्या नारिंगी गोधडीचा खालून वर आणि वरून खाली असलेला निस्सीम विस्तारच जणू. पाताळातला तिमिर हरून आकाशाच्या तार षड्जावर विराजमान असलेल्या तेजोनिधीचा प्रकाश आम्हाला मिळू दे जेणेकरून मन्द्र सप्तकातला आमचा षड्ज अभय होऊ दे! प्रार्थना ती अशी पाहिजे. तार षड्जावरून तुझी छाया, माया आमच्यावर पसरतेय, त्या तार सप्तकातल्या स्वयंभू गंधाराची पुण्याई असलेल्या पुण्य धामावर तू विराजमान आहेस. तुझ्या माझ्यातलं अंतर कसं जोडणार? पण त्याची सोय देखील तूच केली आहेस ना, षड्जावरून पंचमावर येणाऱ्या मींडीचा वारा आणि पंचमावरून खाली येणारा ताऱ्यांचा प्रकाश मला दिसतोय माझ्या षड्जावरून. तू आणि मी वेगळे कुठे? जगजीवना, हा भगवा स्वरांकित दुवा तूच पाठवलास माझ्यासाठी ना? जन्ममरणाचे हे मन्द्रातले फेरे देणारा पण तूच आणि त्यातून सोडवणारा सदय पण तूच!


हे बघ, या मन्द्रातल्या वसंतात फुललेली पंचम-धैवताची रंगीबेरंगी फुलं, तुझीच आहेत ती, हा कुसुमी दुवा पण तुझीच देण. कारण, तू हसताना दिसतोयस त्यात, एखाद्या अवखळ फुलपाखरानं या फुलावरून त्या फुलावर जावं किंवा वाऱ्याच्या प्रत्येक झोताबरोबर फुलांच्या लाटा ताटव्यातून लहराव्या तसं तुझं ते मोतीदार हसू दिसतंय यात. ते हास्य, त्यातलं नाचरंपण स्वच्छ सुरांच्या लडीतून लताबाई दाखवत आहेत मला! तार षड्जाच्या मेघांतून बरसणाऱ्या धारांच्या रूपाने अख्खं मन्द्र सप्तक ओलांडून आम्हाला खाली भेटायला येणारा प्रेमरूप सुद्धा तूच ना रे, हा सुद्धा अजून एक दुवा तुझाच. पण माझी तहान भागत नाही, कितीही वेळा या न त्या रुपात येऊन गेलास तरी पुन्हा कधी येशील, कधी येशील असंच वाटणार मला. माझं हृदय, जीवन तुलाच वाहिलेलं असताना आपल्यातील अंतर क्षणमात्र तरी सहन होईल का मला? या तिलक कामोदातल्या गंधाराने सतत आपल्याकडे यावं असं षड्जाला नाही का वाटत? मग तो गंधार जसा चपलचरण होऊन त्याला भेटायला येतो तसाच तू ये. कधी येशील? ये! हे बघ, तुझ्या आरतीसाठी मी तयारी केली आहे, माझे हे आसुसलेले डोळे आहेत ना, ती म्हणजे दोन निरांजनं. तिलक कामोद तार षड्जाच्या स्वरारतीसाठी मध्यम-पंचमाच्या पणत्या लावतो तसेच माझे हे डोळे, तुझ्याकडे येणारे, तुझी आरती करणारे. तूच तर आहेस सगळंच, तूच तर अखंड, स्थिर, सृजन आणि विलय जिथे एक होऊन जातात असा कालमितीला पुरून उरलेला बिंदुरुपी षड्ज! तुझ्यात विलीन झालो की मी ही भाग या भगव्या गोधडीचा! हे तेजोमया तुझा प्रकाश देऊन माझा षड्ज अभय कर!


अरे बापरे, हे असंच सांगणं असेल का? नसेलही, किंबहुना नसेलच, पण मला ते आता खरं वाटतंय हे मी नाकारू कसं? शेवटी कुठलीही कलाकृती एकदा कलाकाराने करून हातावेगळी केली की ती कुठल्याही रसिकाला कशी भासेल याला एकच मोजमाप लागूच शकत नाही, कारण ते सापेक्ष आहे. एकच कविता प्रत्येक वाचकाला वेगळी होऊन भेटते, त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात, वाचकाची मनोवस्था, सभोतीचं वातावरण, त्या त्या वेळी प्रत्येक शब्दाचे त्याला उमजणारे अर्थ आणि तरीही त्या प्रत्येक वेळी त्याला भावलेला तो अर्थ तितकाच खरा. शेवटी शकुनवंत वाटणं हे सुद्धा संस्काराधारितच नाही का? तिलक कामोद मला शकुनवंत वाटतो, किती? तर तुलसी विवाहाला अंगावर झेंडूच्या माळा आणि कडेला पणत्यांची आरास घेऊन अंगणातल्या वृंदावनात विराजमान झालेल्या तुळशीसारखा. पणतीच्या प्रकाशात तिचं प्रत्येक पान न् पान कृष्णाची वाट पाहत असतं, ते सगळं जितकं शकुनवंत तितकाच तिलक कामोद शकुनवंत म्हणूनच आज या भगव्या गगनपटलाला बघून त्यात मला 'गगन सदन' ची तेजोमयाला मारलेली हाक दिसली. हे संस्कार आहेत, वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या त्या तुळशी विवाहातला शकुन बघायचे, जगायचे झालेले संस्कार असोत किंवा राग ऐकून त्याच्या वातावरणातला शकुन बघायचे झालेले संस्कार असोत. मला ती शकुनवंती प्रार्थना आता ऐकू आली म्हणून माझ्यासाठी ती खरी! बाकी संस्कार आहे म्हणून तुलसीविवाह नाहीतर झाडाचे प्रकाशसंश्लेषण, संस्कार आहे म्हणून कविता नाहीतर पांढऱ्यावर काळे, संस्कार आहे म्हणून तिलककामोद नाहीतर आवाजांचा गुंता!


- कुलदीप

Comments